भिगवण (प्रतिनिधी):
बळीराजा ढाब्याच्या लोखंडी बोर्डाचे काम करताना महावितरणच्या मुख्य वाहिनीवरून अनधिकृतपणे वीज घेणाऱ्या आणि एका निष्पाप तरुणाला शॉक लागून मृत्यू पावण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भिगवण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मृताच्या नातेवाईकांनी मेडिकल बिलाचे पैसे मागितले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
मदनवाडी-चौफुला येथील फिर्यादी रोहित मच्छिंद्र कसबे (वय २८) यांचा भाऊ सौरभ मच्छिंद्र कसबे (वय २६) याला आरोपी संतोष उर्फ मुकेश पवार आणि बळीराजा ढाब्याचा मालक सागर खाडे यांनी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भादलवाडी हद्दीतील ढाब्याजवळ बोलावले होते. आरोपी ढाब्याच्या लोखंडी बोर्डाचे काम करण्यासाठी MSEB च्या पोलवर अनधिकृत आकडा टाकून वीज घेत होते.
सौरभने वीजप्रवाहाचे काम करण्यास नकार दिला असतानाही, "फक्त वायर धरून हलव म्हणजे आकडा खाली पडेल," असे सांगून आरोपींनी त्याला धोक्याची कल्पना असतानाही वीज वाहिनी हाताळण्यास भाग पाडले. यावेळी जोराचा विद्युत धक्का बसल्याने सौरभच्या हाताला, छातीला व पाठीला गंभीर जखमा झाल्या. गंभीर जखमी झालेल्या सौरभवर पुण्यातील सूर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, ५ मार्च रोजी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर फिर्यादी रोहित व त्यांची बहीण आरती यांनी आरोपी संतोष पवार याच्याकडे उपचाराच्या बिलासाठी पैशांची मागणी केली. मात्र, आरोपीने मदत करण्याऐवजी उलट फिर्यादीला शिवीगाळ करत "तुला तर बघूनच घेतो" अशी धमकी दिली.
या प्रकरणी रोहित कसबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिगवण पोलिसांनी आरोपी संतोष उर्फ मुकेश पवार आणि सागर खाडे यांच्यावर BNS कलम १०६(१), ३५१(२) , ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड फौजदार वारंगडसो हे सपोनि महागडेसो यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Post a Comment