वाढत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांची होणारी वणवण थांबवण्यासाठी तरुणांचा कौतुकास्पद पुढाकार.
इंदापूर तालुक्यातील अकोले, पोंधवडी आणि भादलवाडी परिसरातील वनक्षेत्रात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मदनवाडी येथील शिव फाउंडेशनच्या वतीने पुढाकार घेत या वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या उपक्रमामुळे हरिण, ससे, कोल्हे आणि लांडगे यांसारख्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा शोध घेत अनेकदा वन्य प्राणी मानवी वस्तीकडे किंवा मुख्य रस्त्यांकडे धाव घेतात. यामुळे रस्ता ओलांडताना अनेक प्राण्यांना भीषण अपघातांना सामोरे जावे लागते, ज्यात अनेक निष्पाप जीवांचा बळी जातो. शिव फाउंडेशनने पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिल्याने आता हे प्राणी वनक्षेत्रातच सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे...
या उपक्रमाबाबत माहिती देताना शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर म्हणाले की, "सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढत असल्याने मुक्या प्राण्यांचे पाण्यासाठी हाल होत होते. ही परिस्थिती पाहून आम्ही अकोले, पोंधवडी आणि भादलवाडी येथील कृत्रिम पाणवठे भरण्याचा निर्णय घेतला. उन्हाळा संपेपर्यंत गरजेनुसार हे पाणवठे नियमितपणे भरले जातील, जेणेकरून एकाही प्राण्याला तहानलेला राहावे लागणार नाही."
या सामाजिक कार्यासाठी शिव फाउंडेशनच्या सदस्यांसह परिसरातील इतर मान्यवरांनीही उपस्थिती लावली. यामध्ये संतोष सवाने, औदुंबर हुलगे, अल्ताफ शेख, दिनेश मारणे, जैन संघाचे संतोष अब्बड, अकबर तांबोळी, योगेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिव फाउंडेशनच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत असून, वन्यजीव प्रेमींनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


Post a Comment