अकोले (प्रतिनिधी):
इंदापूर तालुक्यातील अकोले येथील ग्रामदैवत श्री अंकलेश्वर देवाच्या वार्षिक यात्रेला चैत्र वद्य प्रतिपदा, शुक्रवार दि. ३ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवासाठी गावाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी सकाळी ६ वाजता श्री अंकलेश्वर देवाचा विधीवत अभिषेक आणि महापूजा संपन्न होईल. त्यानंतर यात्रेला अधिकृत सुरुवात होईल. दुपारी ४ वाजता गावातून 'निशाण काठ्यांची' सुविद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता ढोल-ताशांच्या गजरात देवाचा भव्य 'छबिना' व 'कावड मिरवणूक' निघणार असून, यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात येईल. मिरवणुकीनंतर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना 'शेरणी' वाटप करण्यात येईल.
यात्रेनिमित्त आलेल्या रसिकांसाठी शुक्रवारी रात्री १० वाजता 'मंगला बनसोडे' यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी याच तमाशाचा 'हजेरीचा' कार्यक्रम संपन्न होईल.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी दुपारी २ ते ४ या वेळेत जुन्या परंपरेतील 'कलगीवाले व तुरेवाले' यांचा खडाजंगी 'भेदीक सामना' रंगणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता कुस्ती शौकिनांसाठी 'भव्य कुस्त्यांचा आखाडा' भरवण्यात येणार असून, यात पंचक्रोशीतील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत.
यात्रेचा समारोप शनिवारी रात्री १० वाजता '३६ नखरेवाली' या भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने होईल. यात्रेनिमित्त अंकलेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिर परिसर उजळून निघाला आहे. या यात्रेसाठी अकोले परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
मंगला बनसोडे यांचा तमाशा, कुस्त्यांचा आखाडा आणि ३६ नखरेवाली ऑर्केस्ट्रा ठरणार मुख्य आकर्षण..
अकोले (इंदापूर) येथील अंकलेश्वर देवाचे मंदिर...

Post a Comment