भिगवण: प्रतिनिधी
सोलापूर-पुणे महामार्गावर मौजे डाळज नं. २ च्या हद्दीत आज गुरुवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. टायर पंचर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या इको गाडीने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात सांगोला येथील एकाच कुटुंबातील दोन महिला आणि दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास सोलापूर-पुणे लेनवर आयशर टेम्पो (क्र. MH 13 CU 5163) चा टायर पंचर झाल्याने तो हायवेच्या कडेला धोकादायक स्थितीत उभा होता. याच दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी इको गाडीने (क्र. MH 12 XE 8816) या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की इको गाडीचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.
या अपघातात अदिती अमर हातेकर (वय २५), सखुबाई ईश्वर गेजगे (वय ६०) आणि जय अमर हातेकर (वय २ वर्षे, सर्व राहणार सांगोला, सोलापूर) यांचा मृत्यू झाला आहे.
तर इको गाडीचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०, रा. पाटस) हे गंभीर जखमी झाले असून, स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४) आणि अवघ्या १० महिन्यांची चिमुरडी समृद्धी गेजगे हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment