⚡ ब्रेकिंग News

भिगवण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शेतकऱ्यांना दिलासा, केबल चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद, ६.३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..

भिगवण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शेतकऱ्यांना दिलासा, केबल चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद, ६.३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

समर्थ न्युज नेटवर्क भिगवण: 


उजनी धरणाच्या बँक वॉटर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी आणि केबल चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ६ लाख ३३ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या कारवाईमुळे परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या बँक वॉटर परिसरातील पाण्याच्या मोटारी व केबल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण होते. घटनेचे गांभीर्य ओळखून भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे डिकसळ गावाजवळ भिगवण ते राशीन रोडवर नाकाबंदी व वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली होती.

दिनांक २७/०६/२०२६ रोजी रात्री ३:०० वाजण्याच्या सुमारास, मौजे डिकसळ गावच्या हद्दीतील पोलीस चौकीसमोर पोलीस अंमलदार अजित सरदे यांना एका गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. राशीन बाजूस कडून भिगवण बाजूस एक पांढऱ्या रंगाची फोर व्हीलर गाडी येत असून, त्यामध्ये चोरीचा माल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीवरून पोलीस अंमलदार अजित सरदे यांनी तात्काळ प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांना कल्पना दिली. पोलिसांनी तात्काळ स्टाफसह नाकाबंदी करून संशयित वाहन अडवले. गाडीची झडती घेतली असता, पोलिसांना गाडीमध्ये काळ्या, निळ्या, लाल आणि कस्तुरी रंगाची अंदाजे ९८१ मीटर लांबीची तांब्याची वायर (केबल) आढळून आली.

या प्रकरणी पोलिसांनी खालील संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे:

१) निलेश राजकुमार मोढे (वय २१ वर्षे, रा. सत्यम अपार्टमेंट, सेक्टर १९, खारघर, रायगड)

२) मनोज गुलाब बिंद (वय ३७ वर्षे, रा. बरेनी बारीपूर, ता. कछवा, जि. मिर्झापूर)

३) डब्लू बाबुलाल बिंद (वय ३१ वर्षे, रा. सदर)

४) विजयकुमार राशिंकार बिंद (वय २५ वर्षे, सदर)

५) विलास शिवराज बिंद (वय २० वर्षे, रा. सर्व सध्या रा. गोपालपट्टी, शेवाळवाडी फाटा, मांजरी, पुणे)

संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १,३३,६५० रुपये किमतीची तांब्याची केबल वायर आणि गुन्ह्यात वापरलेली ५,००,००० रुपये किमतीची हुंडाई एक्सेंट कार (क्र. एम.एच. १२/ क्यू.डब्ल्यू. ०९८५) असा एकूण ६,३३,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १६४/२०२६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपींकडून दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४५/२०२६, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत असलेला गुन्हासुद्धा उघडकीस आणण्यात आला आहे.

ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक मा. गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी मा. मधुकर भटटे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सोमनाथ शेंडगे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अजित सरदे, प्रसाद पवार, गणेश पालसाडे, सचिन पवार, समीर झांबरे, रणजीत मुळीक, महेश चोरमले, आप्पा भांडलकर आणि होमगार्ड राजेश लोंढे, स्वयंम वाघ यांनी केली आहे.


या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास करचे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...