रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या अध्यक्षपदी प्रविण वाघ, तर सचिवपदी डॉ. प्रशांत चवरे यांची निवड!
भिगवण येथील बैठकीत रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा; सामाजिक कार्यावर भर देणार असल्याचा निर्धार...
भिगवण: समर्थ न्युज नेटवर्क
रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वर्ष २०२६-२७ च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, क्लबच्या अध्यक्षपदी प्रविण वाघ तर सचिवपदी डॉ. प्रशांत चवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यासोबतच उपाध्यक्षपदी मयुरेश रायसोनी आणि खजिनदारपदाची जबाबदारी संजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांच्या अध्यक्षतेखाली भिगवण येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी वर्षातील नियोजनावर चर्चा करून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी रोटरी क्लबचे प्रमुख सदस्य रियाज शेख, संपत बंडगर, संतोष सवाने, नामदेव कुदळे, संजय खाडे, कुलदीपक ननवरे, औदुंबर हुलगे, किरण रायसोनी, धनेन्द्र गांधी यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध सामाजिक उपक्रमांवर भर देणार: अध्यक्ष प्रविण वाघ
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष प्रविण वाघ यांनी सर्वांचे आभार मानले. "येणाऱ्या कार्यकाळात रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्व सदस्यांना आणि नागरिकांना सोबत घेऊन काम केले जाईल. परिसरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, आणि आरोग्यविषयक क्षेत्रांत लोकाभिमुख उपक्रम राबवण्यावर आमचा मुख्य भर असेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर भिगवण परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून प्रविण वाघ, डॉ. प्रशांत चवरे आणि इतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Post a Comment