इंदापूर प्रतिनिधी :
संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग ९६५ जी) कामात होत असलेला विलंब आणि निकृष्ट दर्जाबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी (दि. २८) नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाटलांनी या मार्गावरील समस्यांचा पाढा वाचला. या भेटीची दखल घेत नितीन गडकरी यांनी येत्या १० एप्रिल रोजी स्वतः पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे जाहीर केले आहे.
निकृष्ट कामे आणि टोल वसुलीवर गडकरींचा संताप
या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी पालखी मार्गावरील अनेक गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. प्रामुख्याने जंक्शन उड्डाणपूल, गोतोंडी उड्डाणपूल, निमगाव केतकी बायपास आणि वडापुरी येथील कामांचा यात समावेश आहे. "रस्त्याची कामे अपूर्ण असताना टोल वसुली कशी काय सुरू झाली?" असा थेट सवाल गडकरींनी उपस्थित केला. त्यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून कामात सुधारणा करण्याचे आणि प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
या प्रमुख मागण्यांवर झाली चर्चा:
- उड्डाणपूल व भुयारी मार्ग: जंक्शन, गोतोंडी, वडापुरी येथील उड्डाणपूल आणि वकीलवस्ती येथील भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे.
- बाह्यवळण रस्ते: बावडा आणि निमगाव केतकी येथील बायपास रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लावणे.
- सुशोभीकरण व सुरक्षा: इस्टिमेटप्रमाणे वृक्षारोपण, रस्ता दुभाजक, स्ट्रीट लाईट आणि दिशादर्शक फलक लावणे.
- गटार व्यवस्था: अनेक ठिकाणी गटारींची कामे अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास दूर करणे.
इथेनॉल प्रकल्पावरही खलबते
रस्ते विकासासोबतच हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याशी इथेनॉल निर्मिती आणि त्यातील भविष्यातील संधींबाबतही सविस्तर चर्चा केली. गडकरींचा १० एप्रिलचा दौरा हा पालखी मार्गाच्या कामाला गती देणारा ठरेल, असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला.
#NitinGadkari #HarshvardhanPatil #PalkhiMarg #IndapurNews #Bhigwan #MaharashtraPolitics #NHAI #Infrastructure #SantTukaramMaharajPalkhiMarg #RoadSafety #BreakingNews #MarathiNews #इंदापूर #नितीनगडकरी #हर्षवर्धनपाटील #पालखीमार्ग #मराठीबातमी


Post a Comment