मदनवाडी तालुका इंदापूर येथील सुपर गादी सेंटरला भीषण आग; १० ते १२ लाखांचे मोठे नुकसान**
**समर्थ न्युज नेटवर्क**
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे आज एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. येथील भिगवण बारामती रोडवर असलेल्या 'सुपर गादी सेंटर'ला अचानक भीषण आग लागली. ही आग एवढी भयानक होती की, काही वेळातच आगीच्या ज्वालांनी संपूर्ण दुकानाला आपल्या कचाट्यात घेतले. या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० ते १२ लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.
**शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज**
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुकानामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि त्यामुळे ठिणगी पडून कापूस व गादी बनवण्याच्या साहित्याने पेट घेतला. कापूस आणि कपड्यांचे प्रमाण जास्त असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. दुकानातून अचानक काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसल्याने परिसरात एकच खळबळबळ उडाली.
**स्थानिक नागरिक आणि प्रशासनाची धाव**
आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आणि तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी तातडीने पाण्याचे टँकर आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तात्काळ अग्निशामक दलालाही याबाबत पाचारण करण्यात आले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले, परंतु तोपर्यंत दुकानातील बहुतांश माल जळून खाक झाला होता.
**१० ते १२ लाखांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली**
या गादी सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार गाद्या, सोफा साहित्याचे कापड, कपाशी आणि इतर महागडे साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. या भीषण आगीत हे सर्व साहित्य पूर्णपणे जळून कोळसा झाले आहे. यामुळे दुकानदाराचे अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने आग लागली तशी आत असलेले लोक वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, हीच एक मोठी दिलासादायक बाब आहे. या घटनेमुळे मदनवाडी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे..


إرسال تعليق