एलआयसी बारामती शाखेचा 'सुपरफास्ट' कारभार! मृत्यू दावा अवघ्या अर्ध्या तासात मंजूर, वारसांच्या खात्यात रक्कम जमा..
समर्थ न्युज नेटवर्क:-
ग्राहकांच्या कठीण प्रसंगी धावून जाण्यात भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) नेहमीच आघाडीवर असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा बारामतीमध्ये आला आहे. एलआयसीच्या बारामती शाखेने ग्राहकसेवेचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. एका पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरचा दावा अवघ्या ३० मिनिटांत मंजूर करून, विम्याची रक्कम थेट वारसांच्या बँक खात्यात जमा करण्याची विक्रमी कामगिरी या शाखेने केली आहे. एलआयसीच्या या तत्पर आणि ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय? -
लाटे (ता. बारामती) येथील रहिवासी शशिकांत बबनराव खलाटे हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात 'ऊस पुरवठा अधिकारी' म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या भविष्यासाठी एलआयसीच्या 'जीवन लाभ' आणि 'जीवन सरल' या दोन विमा पॉलिसी घेतल्या होत्या. काही दिवसांपूर्वी छातीत संसर्ग (Infection) झाल्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील ऑर्चिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, ६ दिवसांच्या उपचारादरम्यान १८ मे २०२६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
अधिकारी आणि प्रतिनिधींच्या तत्परतेमुळे अशक्य गोष्ट शक्य -
पतीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी व वारस उषा शशिकांत खलाटे यांनी एलआयसीकडे मृत्यू दावा (Death Claim) सादर केला. या दुःखद प्रसंगी कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार मिळावा यासाठी विमा प्रतिनिधी बाळासाहेब गायकवाड, तसेच अविनाश भापकर आणि अक्षय खलाटे यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विशेष सहकार्य केले.
दाव्याची फाईल शाखेत पोहोचताच बारामती शाखेचे शाखाधिकारी श्री. अजय कांबळे आणि उपशाखाधिकारी श्री. दिपक वेताळ यांनी प्रशासकीय प्रक्रिया वेगाने फिरवली. प्रशासन अधिकारी सोमराज देशमुख आणि क्लेम विभागातील अधिकारी मीनल मोरे यांनी कागदपत्रांची पडताळणी करून, अर्ज मिळाल्यापासून *अवघ्या अर्ध्या तासात*
सर्व प्रक्रिया पूर्ण केली. विमा दाव्याची संपूर्ण रक्कम तातडीने वारसांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. यावेळी विभागीय कार्यालय पुणे-२ च्या श्रीमती चिपळूणकर मॅडम देखील उपस्थित होत्या.
वारसांकडून कृतज्ञता व्यक्त-
"कुटुंबातील मुख्य व्यक्ती गेल्यामुळे आम्ही मोठ्या धक्क्यात होतो. अशा कठीण प्रसंगी कागदपत्रांच्या घोळात न अडकवता, एलआयसीने केवळ अर्ध्या तासात आम्हाला आर्थिक मदत मिळवून दिली. एलआयसीच्या या संवेदनशील आणि जलद सेवेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत."
— उषा शशिकांत खलाटे (वारस)
ग्राहकांच्या गरजा ओळखून अत्यंत पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्याच्या एलआयसीच्या बांधिलकीचे हे एक उत्तम आणि दुर्मिळ उदाहरण मानले जात आहे. या विक्रमी क्लेम सेटलमेंटमुळे बारामती एलआयसी शाखेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



إرسال تعليق