विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 'योग' हीच काळाची गरज - स्वामी परमार्थदेव...
बावडा शिक्षण संकुलात योग शिबिर संपन्न; हर्षवर्धन पाटील यांचाही योगासनांत सहभाग...
इंदापूर (प्रतिनिधी): "योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून ती जगण्याची एक शिस्तबद्ध कला आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन आणि उज्ज्वल भविष्य दडलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीर, मन आणि बुद्धीच्या विकासासाठी योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे," असे प्रतिपादन पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य केंद्रीय प्रभारी प. पू. स्वामी परमार्थदेवजी महाराज यांनी केले.
बावडा (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक संकुलात, पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्टच्या वतीने आयोजित एक दिवसीय योग शिबिरात ते बोलत होते.
दिमाखदार उद्घाटन या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे (नवी दिल्ली) अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि स्वामी परमार्थदेवजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनीही स्वामीजींसोबत प्रत्यक्ष योगासने करून आरोग्याचा संदेश दिला.
यशस्वी जीवनासाठी संयम महत्त्वाचा मार्गदर्शन करताना स्वामीजी पुढे म्हणाले की, "विद्यार्थी दशेत राग न येणे आणि संयम पाळणे हे यशस्वी जीवनाचे गमक आहे. यासाठी नियमित प्राणायाम करणे आवश्यक आहे." त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी लाभदायक अशा विविध योगासनांची आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखवली व त्यांच्याकडून सरावही करून घेतला.
मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी उदयसिंह पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे, स्वप्निल घोगरे, पवनराजे घोगरे, संतोष सूर्यवंशी, अमोल घोगरे, रणजीत गिरमे, रणजीत घोगरे, आचार्य प्रितीश लाड, आचार्य अविनाश, चंद्रशेखर खापणे, योगरत्न दत्तात्रय अनपट (पतंजली योग समिती, इंदापूर), प्राचार्य दशरथ घोगरे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्बीर मुलाणी व अमर निलाखे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उदयसिंह पाटील यांनी मानले...



Post a Comment