भिगवण (प्रतिनिधी)
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. युद्धामुळे इंधन पुरवठा विस्कळीत होईल, या भीतीपोटी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, भिगवण परिसरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या अक्षरशः लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एकीकडे युद्धाची भीती असतानाच दुसरीकडे गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० ते ६० रुपयांनी वधारल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना, आता गॅस दरवाढीमुळे खिश्याला मोठी कात्री लागली आहे.
सध्या उन्हाचा कडाका वाढत असताना, नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. एका सिलेंडरसाठी ग्राहकांना किमान दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. रांगेत उभे राहूनही शेवटी गॅस सिलेंडर मिळेल की नाही, याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
गॅस सिलेंडर साठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती . "दोन तास रांगेत उभे राहूनही जर सिलेंडर संपला तर पुन्हा कधी मिळणार?" असा प्रश्न अनेक नागरिकाना पडला होता. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, भविष्यात गॅसचा तुटवडा भासणार नाही ना, या काळजीने नागरिकांनी गॅस सिलेंडर साठी धाव घेतली.
प्रशासनाकडून स्पष्टतेची गरज अनेक ठिकाणी गॅस वितरणात संथपणा येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेऊन गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत...
"दोन तास रांगेत उभे राहूनही गॅस मिळेल का नाही याची खात्री नाही." —एक त्रस्त ग्राहक...


Post a Comment