भिगवण-भादलवाडी सर्विस रोडवर भीषण अपघात; अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू , चालक ट्रकसह फरार;
भिगवण प्रतिनिधी :
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत बुधवारी रात्री एका भीषण अपघातात ५४ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात ट्रकने समोरून जोरात धडक देऊन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित दगडू वाळके (वय ५४, रा. माऊली अपार्टमेन्ट, भिगवण) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे चिरंजीव अनिकेत अजित वाळके (वय २३) यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास अजित वाळके हे आपल्या दुचाकीवरून (MH-45-L-5980) भिगवण ते भादलवाडी सर्विस रोडने जात होते. बिल्ट कंपनीच्या बी कॉलनी गेटजवळ आणि आयडीबीआय एटीएमच्या समोरून जात असताना, भिगवण बाजूकडून भादलवाडीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने वाळके यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, अजित वाळके यांच्या पोटाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर अज्ञात ट्रकचालकाने जखमीला मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना माहिती देण्याऐवजी ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले.
याप्रकरणी भिगवण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६(१), १२५(A), १२५(B), २८१, ३२४(४) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४/१७७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील करत असून, फरार ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत..


Post a Comment