भिगवण अपहरण प्रकरण: आमदारांची पोलिसांना ४८ तासाची मुदत; मुलीच्या व्हायरल व्हिडिओमुळे तणावात भर....



 भिगवण:

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे दिवसाढवळ्या झालेल्या एका तरुणीच्या अपहरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, "दोन दिवसांत लेक आईच्या कुशीत पाहिजे, नाहीतर गाठ आमच्याशी आहे," असा थेट इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे.

नेमकी घटना काय?

मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी जात होती. हॉटेल आनंदच्या पाठीमागे एका चारचाकी वाहनाने त्यांची दुचाकी अडवली. आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणीची पूड फेकून त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आणि तरुणीला जबरदस्तीने गाडीत ओढून पळवून नेले. याप्रकरणी जहीर हारून शेख आणि आयन हारून शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"या भागात अवैध धंद्यांतून गुन्हेगारी वाढली आहे. जनतेने आता जागृत राहण्याची वेळ आली आहे. पोलिसांना आमची विनंती आहे की दोन दिवसांत मुलीला परत आणा, अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू." आमदार गोपीचंद पडळकर


तपासात नवीन वळण: व्हायरल व्हिडिओचा पेच



दरम्यान, या प्रकरणात एक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी "मी माझ्या मर्जीने गेले असून माझे मुलासोबत प्रेमसंबंध आहेत" असे सांगताना दिसत आहे. मात्र, आमदारांनी आणि नातेवाईकांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मुलीचे लग्न अवघ्या ४ दिवसांवर असताना तिला जबरदस्तीने व्हिडिओ बनवण्यास भाग पाडले असावे, अशी शक्यता लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

भिगवण मध्ये निषेध मोर्चा:

आज भिगवण मध्ये आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भिगवण मध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच तरुण उपस्थित होते.. यावेळी कठोर शब्दात घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच व्हिडिओ वर बोलताना पडळकर यांनी तो व्हिडिओ बळजबरीने बनल्याचे सांगितले, मोर्च्यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवला होता.


महत्त्वाचे मुद्दे:

 * गाव कडकडीत बंद: घटनेच्या निषेधार्थ भिगवणमधील व्यापाऱ्यांनी बुधवारी गाव कडकडीत बंद ठेवले.

 * पोलीस ॲक्शन मोडवर: पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत.

 * ६ पथके रवाना: आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ६ विशेष पथके तैनात केली असून सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू आहे.

 * मुस्लिम समाजाकडून निषेध: स्थानिक मुस्लिम समाजानेही या घटनेचा तीव्र निषेध केला असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या भिगवणमध्ये तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...